News | सुसरी धरणावरून कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जुंपली

प्रसाद आळशी - सकाळ वृत्तसेवा
Wednesday, October 12, 2011 AT 02:45 AM (IST)

ठाणे - डहाणू तालुक्‍यातील सुसरी धरणाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जुंपली आहे. नियोजित धरणाला ग्रामस्थांचा विरोध सुरू झाला असतानाच, आदिवासी विकास राज्यमंत्री व कॉंग्रेसचे स्थानिक आमदार राजेंद्र गावित यांनी "ग्रामस्थांचे मत म्हणजे माझे मत' असे म्हणत धरणाला विरोध केला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुनर्वसन योग्य प्रकारे करण्याचा आग्रह धरला आहे.
सुसरी धरणासाठी 389 कोटी 49 लाख रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. या धरणासाठी आदिवासी शेतकऱ्यांची सुमारे 54 हेक्‍टर जमीन व खासगी 42 हेक्‍टर वनजमीन लागणार आहे. रानशेत, अवढाणी, धानिवली, महालक्ष्मी, गंजाड आदी दहा गावांमधील जमीन संपादन केली जाणार आहे. गंजाड व महालक्ष्मी गावांमधील घरांचे नुकसान होणार नसून, तेथील वनजमीन ताब्यात घेतली जाणार आहे.
सुसरी धरणासाठी सर्वप्रथम 1971 मध्ये सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर 1976 मध्ये दुसरे आणि 2009 मध्ये तिसरे सर्वेक्षण झाले. त्यानंतर धरणाच्या प्रस्तावाला वेग येऊन आता कामाच्या निविदाही मंजूर झाल्या आहेत. मात्र, तेथील ग्रामस्थांनी संघर्ष समिती स्थापन करून धरणाला तीव्र विरोध केला आहे.
सध्या सुसरी धरणाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा; तर कॉंग्रेसचा विरोध, अशी स्थिती निर्माण झाली आहे. धरणग्रस्तांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन करावे, असा आग्रह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार कृष्णा घोडा व जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर यांनी धरला आहे; तर राजेंद्र गावित यांनी "लोकांचे मत म्हणजे माझे मत' असे म्हणत धरणाला विरोध दर्शविला आहे. या धरणासाठी कृष्णा घोडा व आनंद ठाकूर यांच्या पत्रामुळे गती आली, असा प्रचार कॉंग्रेसकडून होत असल्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आरोप आहे. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी ठाकूर व आमदारपदी घोडा यांनी 2009 मध्ये पत्र दिल्याने धरण होत असल्याचा प्रचार होत आहे; तर हा प्रचार खोटा असल्याचे दोघा नेत्यांनी स्पष्ट केले आहे. आमच्या पदाची मुदत सप्टेंबर 2009 मध्ये संपुष्टात आली. अशा पत्राची प्रत दाखविल्यास राजकारणातून निवृत्त होऊ, असे आव्हान ठाकूर व घोडा यांनी दिले आहे. कृष्णा घोडा यांचे रानशेत येथे निवासस्थान आहे. या धरणामधून घोडा यांचे घर व जमीन बचावली आहे. मात्र, माझी जमीन सरकारने घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

'
सुसरी धरणासाठी शेकडो आदिवासींना विस्थापित करणे चुकीचे आहे. त्यांना दहा लाख रुपयांचा मोबदला दिला, तरी त्यातून भवितव्य घडणार नाही. वसई-विरार वा कोणत्याही शहरांना पाणी देण्यास आमचा विरोध नाही. त्यांना अन्य ठिकाणांहून पाणी द्यावे. राज्य सरकारचा मी घटक असलो, तरी लोकांना जे हवे आहे ते देण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यांचे मत म्हणजे माझे मत आहे,'' अशा शब्दांत राज्यमंत्री गावित यांनी "सकाळ'शी बोलताना धरणाला विरोध स्पष्ट केला. सिडकोने वसई-विरारसाठी छोट्या नद्यांमधून पाणीपुरवठा करण्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राजेंद्र गावित-राष्ट्रवादी वादाला आता 'सुसरी'चे निमित्त!
सुसरी धरणाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका मार्चमध्ये होणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर हा वाद आणखी रंगण्याची दाट शक्‍यता व्यक्त केली जात आहे. आता सुसरी धरण हे निमित्त असले, तरी याआधीही राज्यमंत्री राजेंद्र गावित व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कपिल पाटील यांच्यात वाद रंगला होता. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही गावित व आनंद ठाकूर यांच्यातील संभाव्य वादात पालकमंत्री गणेश नाईक यांनी मध्यस्थी केली होती. कॉंग्रेसचे जिल्ह्यात आव्हान राहू नये, यासाठी गावित यांना टार्गेट करण्यात येत असल्याचा दावा कॉंग्रेस समर्थकांकडून केला जात आहे.

Original - http://72.78.249.107/esakal/20111012/4748534799278999595.htm 

No comments:

Post a Comment