News | सुसरी धरणाच्या विरोधात मोर्चा

म . टा . वृत्तसेवा पालघर
डहाणू तालुक्यातील आदिवासी खोऱ्यात सुसरी नदीवर धरण बांधून वसई - विरारला पाणी देण्याच्या विरोधात येथील हजारो आदिवासींनी चारोटी जवळील कासा येथे रविवारी प्रचंड मोर्चा काढून विरोध दर्शविला .
' तुमच्या पाण्याची सोय तुमच्याच तालुक्यातून निर्माण करा , आमच्या वाटेला जाल तर याद राखा ', असा जोरदार व खणखणीत हल्ला वसई तालुक्यातील बिल्डर लॉबी तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसवर चढविला .
मोर्चाकरिता डहाणू तालुक्यातील २० हजारांहून अधिक आदिवासी स्त्री - पुरूष १५ - २० कि . मी . चालत आपल्या लहान मुलासह उपस्थित होते . चारोटी येथेून मोर्चाला सुरूवात झाल्यानंतर दोन कि . मी . अंतरावरील कास येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले . डहाणू तालुक्यातील सुसरी नदीच्या सुपीक जमिनीच्या खोऱ्यात धरण बांधून त्यातील पाणी वसई तालुक्यात नेण्याच्या राज्य सरकार व वसईतील बिल्डर लॉबी विरोधात डहाणू तालुक्यासह ठाणे जिल्ह्यातील सर्वच आदिवासींनी रणशिंग फुंकले असून त्यास आदिवासी लोकप्रतिनीधीदेखील मागे नसल्याचे चित्र मोर्चानंतर झालेल्या भव्य सभेत दिसून आले .
डहाणू तालुक्यातील धानिवरी , नवनाथ , रानशेत , दहीगाव , आंवढाणी , देवूर , महालक्ष्मी , गंजाड , गणेशबाग , ओसरवीरा या गावातील एक हजार हेक्टर जमीन वापरण्यात येऊन तेथील आदिवासी विस्थापित होणार आहेत . या सुसरी धरणाला विरोध करताना संघर्ष समितीचे अध्यक्ष नरेश बोलाडा यांनी या सेभेत हल्ला चढविताना वसईतील बिल्डरांनी त्यांच्या तालुक्यातील गृहप्रकल्पासाठी २०२१ पर्यंतचा विचार केलेला दिसत असून त्याकरिता त्यांनी इतरांच्या घरातून ओरबाडून खाण्याचा सपाटा लावला आहे . म्हणूनच शेतीसाठी निर्माण करण्यात आलेल्या सूर्या धरणाचे सारे पाणी त्यांनी पिऊन टाकले . त्या पाण्याने तहान भागली नाही म्हणून आता सुसरीवर त्यांचा डोळा आहे . मात्र आम्ही आदिवासी निर्वाणीचा इशारा देत आहोत की झाले तेवढे पुरे झाले यापुढे आम्ही अन्याय सहन करणार नाहीत .
राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांनी , स्थानिक नागरिकांना विस्थापित करून बिल्डरांची तुमडी भरणार असतील तर अशा प्रकल्पांना विरोध करणाऱ्या जनतेबरोबर आपण राहू , असे आश्वासन दिलेे .
भाजपचे विक्रमगड - जव्हारचे आमदार चिंतामण वनगा यांनी , ठाणे जिल्ह्यात आम्ही पाच आदिवासी आमदार असून आदिवासींच्या जीवनाशी खेळणाऱ्या अशा प्रश्नावर विधानसभा अधिवेेशनात हल्ला चढवून कामकाज होऊ देणार नाही , असा इशारा दिला .
डहाणूचे आमदार राजा ओझरे यांनी सांगतिले की आपण येत्या अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडणार असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या प्रकल्पास विरोध करून जनतेसोबत राहील .
यावेळी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग बेलकर , कष्टकरी संघटनेचे सिराज बलसारा , ब्रायन लोबो , ' भारत मुक्तीमोर्चा ' चे रवींद्र माळी , मानव विकास संघर्ष संघटनेचे वझे आदींनी विचार मांडले .

Original Link - http://origin.maharashtratimes.com/articleshow/10303231.cms

No comments:

Post a Comment